महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ठक्कर डोम येथे ‘कुंभ भक्ती संगम’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भक्तिमय आणि वैचारिक सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भक्तिसंगीतासोबतच संत परंपरा, भारतीय संत आणि समरसता, राष्ट्रीय योगदान तसेच विविध वैचारिक विषयांवरील चर्चांचा अनुभव नाशिककरांना या महोत्सवातून घेता येणार आहे.

आजच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत ‘भारतीय संत आणि समरसता’ या विषयावर विचारमंथन होणार आहे. या सत्राचे समन्वय पराग महाराज चातुर्मासी करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत ‘संत परंपरेचा सहभाग आणि समन्वय’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली असून, या चर्चेचे समन्वयक डॉ. सदानंद मोरे आहेत.

सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हरिभक्त परायण डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८ ते १० या वेळेत सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या भक्तिमय भजनांची मैफल रंगणार आहे.

भक्तिसंगीत, संत विचार आणि वैचारिक चर्चांचा संगम असलेल्या या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय आणि वैचारिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.