नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केंब्रिज स्कूलसमोरील मुख्य रस्त्याची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक, पादचारी आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून शाळेच्या परिसरात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी ते अत्यंत संथ गतीने होत आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, हा परिसर भाजप गटनेत्यांच्या प्रभागात येत असल्याने स्थानिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, तसेच नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.