नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आता आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहन दुरुस्ती व्यावसायिकांच्या माहितीनुसार, खड्डेमय रस्त्यांमधून वारंवार प्रवास केल्याने सस्पेन्शन, शॉक अॅब्झॉर्बर, टायर, व्हील अलाइनमेंट, स्टेअरिंग आणि इतर महत्त्वाचे पार्ट्स खराब होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे.
दुचाकीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी साधारण ५०० ते २ हजार रुपये, तर चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा खर्च होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.


