नाशिक रोड प्रभाग समितीची सभा शहरातील विविध स्थानिक प्रश्नांमुळे चांगलीच गाजली. रस्त्यांवरील खड्डे, नाशिक–पुणे महामार्गावरील दत्तमंदिर ते सिन्नर फाटा उड्डाणपूल, सावरकर उड्डाणपूलाची दुरवस्था तसेच पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत उत्तरांची मागणी केली.
सभेदरम्यान नगरसेविका रुचिरा साळवे यांनी सावरकर उड्डाणपूलावरील रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता खरडून ठेवण्यात आल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नगरसेविका भारती ताजनपुरे आणि नगरसेवक योगेश भोर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांकडे तीव्र शब्दांत जाब विचारला.
प्रभाग क्रमांक १९ मधील सामनगाव रोडवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर नगरसेवक योगेश भोर यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष छायाचित्रे दाखवत परिस्थितीचे गांभीर्य मांडले. नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.
सभेत नाशिक रोड परिसरातील पाणीपुरवठ्याचाही मुद्दा जोरदार चर्चिला गेला. नगरसेवकांनी पाणीटंचाई आणि अनियमित पुरवठ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर प्रभाग समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नावर स्वतंत्र विशेष सभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
स्थानिक नागरिकांशी संबंधित मूलभूत प्रश्नांवर झालेल्या या चर्चेमुळे नाशिक रोड प्रभाग समितीची सभा चांगलीच गाजली. आता प्रशासन या प्रश्नांवर किती वेगाने कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


