नाशिक:नाशिकच्या वडाळा गावात अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न कायम असून, गावातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्यात मोठी विषमता असल्याचे चित्र समोर आले आहे. काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

माळी गल्ली, संजरी मार्ग आणि केबीएच शाळा परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून आले. मात्र, काही ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याची स्थितीही समोर आली आहे.

काही ठिकाणी टाक्या भरून वाहणे, नळांना तोट्या नसणे आणि मोटारींचा वापर होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे सलीम पॉईंट, रामोशी वाडा, कोळीवाडा, गरीब नवाज कॉलनी, गणेश नगर आणि राजवाडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वडाळा गावाला चार ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक ठिकाणी पाइपलाइनमध्ये लिकेज असल्याने पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.

काही ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेसोबतच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे पाण्याचा अपव्यय आणि दुसरीकडे अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना अशी विरोधाभासी परिस्थिती वडाळा गावात पाहायला मिळत आहे.