नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून २३ जुलैअखेर सुमारे ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ५ लाख १४ हजार ४३० हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती समोर आली आहे.
यंदा जिल्ह्यात सर्वाधिक मका पिकाची लागवड झाली आहे. आतापर्यंत २ लाख ९२ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली असून, १ लाख १ हजार ८९८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. इतर खरीप पिकांची पेरणीही अंतिम टप्प्यात आहे.
यंदाच्या हंगामात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरणीला मोठा विलंब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेगाने पूर्ण केली.
सध्या पावसामुळे पिकांना चांगला आधार मिळाला असून शेतकऱ्यांचे लक्ष पुढील मशागतीच्या कामांकडे लागले आहे. आता फवारणीसाठी पाऊस उघडण्याची शेतकरी प्रतीक्षा करत असून, पुढील काही दिवसांतील हवामानाचा पिकांच्या वाढीवर महत्त्वाचा परिणाम होणार आहे.


