नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कोथिंबीर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बाजारात कोथिंबिरीला अवघा २ ते ३ रुपये प्रति जुडी भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र, सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यातच बाहेरगावी मागणी घटल्याने बाजारात कोथिंबिरीची आवक वाढली आणि दरात मोठी घसरण झाली.

सध्याच्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च, मजुरी आणि इतर खर्चही भरून निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना कराव्यात आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.