नाशिक : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत इंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या टीडीआर प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. सुमारे १२ कोटी रुपयांच्या टीडीआर व्यवहारात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने ब्लॅकमेलिंग होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी सभागृहात केला. तसेच या प्रकरणात सिडकोतील एका माजी नगरसेवकाचा हस्तक्षेप असल्याचाही दावा त्यांनी केला.

या आरोपांची दखल घेत स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. संबंधित समितीला दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

इंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता प्रस्तावित असल्याने नाशिक महानगरपालिकेने ८ हजार २११ चौरस मीटर जागेचे भूसंपादन केले होते. त्याच्या मोबदल्यात संस्थेला १६ हजार ४२२ चौरस मीटर क्षेत्रफळाचा टीडीआर मंजूर करण्यात आला होता.

बाजारभावानुसार या टीडीआरच्या विक्रीतून संस्थेला आणि सभासदांना सुमारे १२ कोटी रुपयांचा लाभ होणे अपेक्षित होते. मात्र, संस्थेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी टीडीआरची परस्पर विक्री केल्याचा आरोप किरण गामणे यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. या व्यवहारामुळे संस्थेच्या सभासदांचे आर्थिक नुकसान झाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

 

https://youtu.be/wrjgcw7Jk7w?si=EPvogvQkxpc-RmaL 

 

सभेदरम्यान गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करून ब्लॅकमेलिंग करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या संपूर्ण प्रकरणात सिडकोतील एका माजी नगरसेवकाचा हस्तक्षेप असल्याचा दावाही करण्यात आला. या आरोपांमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थायी समितीने त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली असून समितीला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.