नाशिक रोड परिसरातील देवळाली गावातील लिंगायत कॉलनीत भरदुपारी तीन घरफोड्यांची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील तीन बंद घरांना लक्ष्य करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधली

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश उमाकांत सोनवणे, त्यांचे मामा संतोष जाधव आणि त्यांचे मित्र विकी दीपक जाधव हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरांना कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तिन्ही घरांमध्ये प्रवेश केला आणि चोरी केली.

रोख रकमेसह दागिने चोरीला

अविनाश सोनवणे यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने चोरीला गेले. संतोष जाधव यांच्या घरातून १४ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

तर विकी जाधव यांच्या घरातून १० हजार रुपये रोख, लहान मुलाच्या सोन्याच्या बाळ्या तसेच हातातील आणि पायातील पैंजण चोरीला गेले. तिन्ही घरांमधून एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद आहे.

उपनगर पोलिसांकडून तपास सुरू

एकाच परिसरातील तीन घरांमध्ये भरदुपारी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध आणि चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.