दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना तातडीची पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे सांगतानाच, सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकार ३१ ऑक्टोबरला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा लागवडीसाठी हमीभाव जाहीर करण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, असे सांगत कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. सावकार असो किंवा फायनान्स कंपनी, शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही शिंदे यांनी टीका केली. खर्गे यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी करत त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध केला. भारत हा नेपाळ किंवा बांगलादेश नसून नवा भारत असल्याचे सांगत, मोदी देश जोडण्याचे काम करतात, तर विरोधक देश तोडण्याचे काम करतात, असा आरोपही शिंदे यांनी केला.