नाशिकमध्ये सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक विधींनी सुरुवात झाली आहे. बुधवारी ऐतिहासिक काळाराम मंदिर आणि कपालेश्वर मंदिरात सिंहस्थ महाकुंभमेळ्याची पहिली निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते देवदेवतांना निमंत्रण देण्यात आले. यानंतर अरुणा, वरुणा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तीर्थपूजन करून सिंहस्थ महाकुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी गोदामातेला साकडे घालण्यात आले. या वेळी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, साधू-महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.