नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंचवटी व लगतच्या परिसरातील ३५ शाळा आणि महाविद्यालयांना शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

रामकुंड येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात पोलीस बंदोबस्त आणि वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे. मालेगाव स्टँड, निमाणी आणि पंचवटी कारंजा परिसरात वाहतूक निर्बंध लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार, पंचवटी वगळता इतर विभागांतील महापालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळी साडेसात ते दहा या वेळेत सुरू राहणार आहेत. तसेच, इतर खासगी शाळांनीही वाहतूक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.