नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामाचा फटका जुन्या नाशिकमधील नागरिकांना बसला आहे. त्र्यंबक नाका पोलिस चौकी परिसरात भूमिगत ड्रिलिंग सुरू असताना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेले. एकीकडे पाण्याची नासाडी, तर दुसरीकडे नळाला पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संबंधित यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे..
भद्रकाली पोलिस ठाणे ते राजीव गांधी भवन या मार्गावर स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्र्यंबक नाका पोलिस चौकीजवळ भूमिगत ड्रिलिंग करताना जुन्या नाशिकला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. याबाबत स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनी महापालिकेला कळविल्याची माहिती आहे. मात्र, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने व्हॉल्व्हमनने पाणी सोडताच रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गळती रोखली; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या घटनेमुळे जुन्या नाशिकमधील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, कालपासून पाणी न आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.
विकासकामांच्या नावाखाली पिण्याच्या पाण्याची अशी नासाडी होत असेल, तर जबाबदार कोण? जलवाहिनी फुटण्यास कारणीभूत ठरलेल्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का, तसेच पाणीपुरवठा पूर्ववत कधी होणार, असा सवाल आता जुन्या नाशिकमधील नागरिक उपस्थित करत आहेत.


