मुंबई : राज्याच्या कारभाराचं केंद्र असलेल्या मंत्रालयात उंदरांचा वावर वाढल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर उंदीर फिरत असल्याची माहिती असून, पत्रकार कक्षातही उंदराने दिवसभर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मंत्रालयातील स्वच्छता आणि उंदरांच्या बंदोबस्ताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंत्रालयातील संगणक, इंटरनेटच्या वायर्स आणि महत्त्वाच्या कागदपत्रांना उंदरांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारी कामकाजासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं आणि संगणकीय यंत्रणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
उंदरांचा वावर रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं चित्र समोर आलं आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत उंदरांचा बंदोबस्त करण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे. या समस्येवर प्रभावी उपाययोजना करून मंत्रालयातील स्वच्छता आणि महत्त्वाच्या दस्तऐवजांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.


