शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शिरपूर शहरातील करवंद नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई द्यावी आणि थकीत पीकविम्याची रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी संघटनेने केली. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी आणि रोजगारावर परिणाम झालेल्या शेतमजुरांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करावा, महिलांना शासकीय योजनांचा लाभ नियमित मिळावा आणि रेशन वितरणातील अडचणी दूर कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन शिरपूर फर्स्ट संघटनेने केले. या मोर्चाबाबत संघटनेचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी भूमिका मांडली.


