नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ परंपरेचा वारसा आता विशेष टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशभर पोहोचणार आहे. ‘माय स्टॅम्प’ उपक्रमांतर्गत रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताची विशेष टपाल तिकिटे तयार करण्यात आली आहेत. या तिकिटांचे अनावरण ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
रामकुंड हे वैष्णव परंपरेचे, तर त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त हे शैव परंपरेचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. या दोन्ही तीर्थस्थळांचा समावेश विशेष टपाल तिकिटांमध्ये केल्यामुळे सिंहस्थाशी जोडलेला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित होणार आहे.
टपाल तिकिटांच्या माध्यमातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची ओळख देशभर पोहोचवण्यासोबतच सिंहस्थाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.


