नाशिकमध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवरून NSUIने सरकारविरोधात आंदोलन छेडले. TET पेपरफुटी, शालार्थ आयडी घोटाळा तसेच सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात NSUI कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान TET पेपरफुटी आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा NSUIच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.