नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या भूजलात घातक हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आढळल्याने प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी आमदार सीमा हिरे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन स्वतंत्र चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रदूषणाचा स्रोत शोधून यापूर्वीच्या तक्रारी आणि तपासणी अहवालांची पडताळणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच बाधित नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


