नाशिक : शहरातील द्वारका भुयारी मार्गाला लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे फाउंडेशनच्या वतीने महापालिकेला निवेदन देऊन त्यांच्या सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्याचा गौरव करण्याची मागणी करण्यात आली.
वामनदादा कर्डक यांची वडाळा नाका परिसर ही कर्मभूमी होती. आंबेडकरी गीतांच्या माध्यमातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. तसेच शिक्षण, विज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, महिला आणि वंचितांच्या प्रश्नांवर गीतांतून प्रबोधन केले. या योगदानाचा सन्मान व्हावा, यासाठी २७ ऑक्टोबर रोजी उपायुक्त नितीन पवार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गोकुळ लोखंडे यांनीही या मागणीसंदर्भात भूमिका मांडली.


