नाशिकच्या सिडको परिसरातील नवीन नाशिक विभागीय महापालिका कार्यालयाजवळ मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याने गेल्या १२ तासांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात चिखल साचला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि जड वाहनांची सातत्याने होणारी वर्दळ यामुळे जलवाहिनी फुटल्याची शक्यता आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत असून परिसरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी होत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे पिण्याचे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे महापालिकेने अशा घटनांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.


