नाशिकच्या गोविंद नगर परिसरातील सदगुरू नगरात रस्त्यावरील खड्ड्यात वाळूचा डंपर अडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ववत करण्यात आला नसल्याने मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यात वाळूचा डंपर अडकल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.


