नाशिक :- नवरात्रोत्सवात छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर; ४३० महिला पोलिसांसह १,६८० महिला कर्मचारी तैनात
नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडियाच्या जल्लोषात महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना रोखण्यासाठी दामिनी पथकासह महिला पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. गरबा मंडळे, मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमांच्या ठिकाणीही महिला पोलिसांचा पहारा राहणार आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्या मदतीसाठी पुरुष पोलिस कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.
या बंदोबस्तात ४३० महिला पोलिस अंमलदार आणि २५० महिला गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश आहे. याशिवाय ४६ पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, सात पोलिस निरीक्षक, २०५ सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, एक हजार २२० पोलिस अंमलदार तसेच एक हजार १०० पुरुष गृहरक्षक तैनात असतील. आरसीपी, एसआरपीएफ आणि क्यूआरटी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
उत्सवादरम्यान छेडछाड, चोरी आणि अन्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे. नागरिकांनी मोबाइल, पाकीट आणि सोन्याच्या दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक मंडळे आणि गरबा आयोजकांनी आवश्यक परवानग्या घेऊन अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही आणि गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. ध्वनिक्षेपक आणि कार्यक्रमांच्या वेळेबाबतचे नियमही पाळावे लागणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन हेल्पलाइनवर मदत मागावी. उत्सवाचा आनंद घेताना सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


