नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (दि. ३१) रामकुंड येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, आज बुधवारी (दि. २८) भरणारा आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच शुक्रवारी (दि. ३०) होणाऱ्या धर्मध्वजाच्या मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह विक्रेत्यांनाही आज बाजार मांडता येणार नाही..

नाशिकमधील म्हसोबा पटांगण आणि गौरी पटांगण येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. याशिवाय गंगाघाट परिसर, गणेशवाडीतील आयुर्वेदिक रुग्णालय ते देवी मंदिरापर्यंतच्या भागातही भाजीपाला विक्रेते आणि अन्य व्यावसायिक दुकाने थाटतात. या बाजारात शेकडो विक्रेते सहभागी होत असून, खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. परिणामी, या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रशासनाकडून परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे. बाजार भरण्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू असून, मुख्य कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. काही भागांत नागरिकांना मर्यादित स्वरूपात पायी ये-जा करण्याची परवानगी दिली जात आहे.

धर्मध्वज मिरवणूक आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गोदाघाट परिसरातील नेहमीची बाजारपेठ आज गजबजणार नाही.