मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल सिग्नल परिसरात मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असतानाच एका चिमुकल्याने आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोहम हेकरे या चिमुकल्याने वाढदिवसाचा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेत मित्रांसह रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला. मुलांनी स्वतः खड्ड्यांमध्ये खडी आणि मुरूम टाकून वाहनचालकांसाठी रस्ता काही प्रमाणात सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमामुळे वाहतुकीतील धोका कमी करण्याचा छोटासा प्रयत्न झाला, तसेच सामाजिक जबाबदारीचेही उदाहरण पाहायला मिळाले. चिमुकल्यांच्या या कृतीचे परिसरातील नागरिकांकडून आणि नाशिककरांकडून कौतुक होत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम असला तरी लहान मुलांनी पुढाकार घेत समाजापुढे सकारात्मक संदेश दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


