अशोका मार्ग ते डीजीपी नगर हा नाशिकमधील महत्त्वाचा मार्ग सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे आणि चिखलामुळे खराब झाला आहे. द्वारका अंडरग्राउंड पासचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली असून दररोज हजारो वाहनचालक या रस्त्याचा वापर करत आहेत. मात्र पकाळ रोडपासून पुढील संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचाही धोका वाढला आहे.

या मार्गावर अशोका स्कूल आणि कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची खराब अवस्था ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या बनली आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की प्रत्यक्ष दर्जेदार काम न करता केवळ काही ठिकाणी मुरूम आणि खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती केली जात आहे.

स्थानिक रहिवासी माजिद पठाण यांनी पकाळ रोड हा १८ मीटर मंजूर असलेला रस्ता असून प्रत्यक्षात ९ मीटरचाच रस्ता करण्यात आल्याचा आरोप केला. उर्वरित कामाबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. तसेच महापालिकेकडे लोकेशन पाठवूनही संपूर्ण रस्ता दुरुस्त न करता केवळ काही ठिकाणीच मुरूम टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका आणि संबंधित ठेकेदार या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.