नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लखमापूर गावातील दिगंबर मोगल यांच्या शेतातील घराजवळ मध्यरात्री बिबट्याने घराच्या दारातून कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली.
ही संपूर्ण घटना घराजवळ बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे


