नाशिकच्या सिडको परिसरातील सद्गुरूनगर, पांगरेनगर, भुजबळ फार्म आणि बडदेनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे. सकाळी आणि शाळा सुटण्याच्या वेळेत या मार्गावर मोठी वर्दळ असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याने कायमस्वरूपी दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सद्गुरूनगर, पांगरेनगर, भुजबळ फार्म आणि बडदेनगर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.


