नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली आहे. या गळतीमुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असून पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

घटनेमुळे परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाईपलाईन फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गळतीमुळे पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी होत असल्याने महापालिकेने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेवर महापालिका प्रशासन कोणती उपाययोजना करते आणि पाणीगळती कधी थांबवली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.