नाशिकमधील प्रमुख बसस्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. महामार्ग, ठक्कर बाजार आणि मेळा बसस्थानक परिसरात दुचाकी, कार आणि इतर वाहने कुठेही उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाहनधारक वाहने लावून निघून जात असल्याने एसटी बसेसच्या ये-जा करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. बसला वळण घेताना तसेच बसस्थानकात प्रवेश करताना चालकांना वाहनांमधून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
या प्रकारामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय. बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांचा धाक नसल्याचे चित्र दिसत असून, बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
एसटी बसेसचा मार्ग मोकळा ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.


