नाशिकच्या समता नगर परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहाची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याचा आरोप समोर आला आहे. इमारतीच्या अनेक भागांना भेगा पडल्या असून काही भाग खचल्याचेही दिसून येत असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

याशिवाय वसतिगृहाच्या बेसमेंटमध्ये ड्रेनेज आणि पावसाचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे. या परिस्थितीमुळे डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची चिंता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने या इमारतीची संरचनात्मक तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी विद्यार्थिनींना सुरक्षित ठिकाणी हलवून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन याबाबत कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.