नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महापालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन केले. प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांना हार घालून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सततच्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि खराब रस्त्यांमुळे वाहनचालक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

यावेळी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.