नाशिकच्या सिडको परिसरातील राणेनगर ते सेंट्रल पार्कला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था समोर आली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि पावसाचे साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.

पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या खराब अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून भविष्यातही ही समस्या निर्माण होणार नाही. तसेच पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.