सातपूर परिसरात सलग दोन दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनांनंतर नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निले कंपनीसमोर झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पपया नर्सरीजवळ झालेल्या दुसऱ्या अपघातात २६ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला.
या सलग अपघातांनंतर सातपूर परिसरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत नागरिकांमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे. नगरसेवक राहुल दिवे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून प्रशासनावर निशाणा साधला आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक खडी आणि मुरूमाच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित करत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेकेदारांच्या कामकाजावरही राहुल दिवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वाढते अपघात रोखण्यासाठी सातपूर परिसरातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


