श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर आणि रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने नाशिक वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवार या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चार प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव स्टँडकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, खांदे सभागृहाकडून रामकुंडकडे जाणारा मार्ग, सरदार चौकाकडून येणारा मार्ग तसेच ढिकले वाचनालयाकडून मंदिराकडे जाणारा मार्ग या चार रस्त्यांवर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
ही वाहतूक व्यवस्था श्रावण सोमवार १७, २४ आणि ३१ ऑगस्ट तसेच ७ सप्टेंबर रोजी लागू राहणार आहे. याशिवाय श्रावण शनिवार २२ आणि २९ ऑगस्ट तसेच ५ सप्टेंबर रोजीही वाहनबंदी लागू असेल. पहिली प्रवेशबंदी १५ ऑगस्ट शनिवार आणि १७ ऑगस्ट सोमवारपासून सुरू होणार आहे.
रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. संबंधित दिवशी या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याने नागरिक आणि भाविकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रावण सोमवार आणि शनिवारच्या दिवशी रामकुंड, गंगाघाट आणि कपालेश्वर मंदिर परिसरात जाणाऱ्या भाविकांनी प्रवासाचे नियोजन करताना या वाहतूक बदलाची नोंद घेणे आवश्यक ठरणार आहे.


