नाशिकच्या रामकुंड परिसरात मुसळधार पावसामुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील जागा पाण्याखाली गेली असून विधी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित असताना कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप पुरोहित संघाने केला आहे. अनेक कुटुंबांना रस्त्यावरच दशक्रिया विधी करावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रकारावर नाराजी व्यक्त करत पुरोहित संघाने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले असून रामकुंड परिसरात तात्पुरती तसेच कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.


