वनजमिनीचे हक्काचे पट्टे, रेशनकार्ड आणि आदिवासी भागातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीत आदिवासी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी थेट मुंबई-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत ठिय्या दिला.
आंदोलक मोठ्या संख्येने महामार्गावर उतरल्याने मुंबई-नाशिक आणि नाशिक-मुंबई या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आदिवासी बांधवांच्या वनजमिनीच्या हक्काचे पट्टे देण्यात यावेत, तसेच रेशनकार्ड आणि इतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी तहसीलदार आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
दरम्यान, महामार्गावरील आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासन आंदोलकांच्या मागण्यांवर काय तोडगा काढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


