नाशिक :  नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकणे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असतानाही प्रत्येक शनिवारी केली जाणारी पाणीकपात कायम ठेवण्यात आल्याने नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा चांगलाच गाजला. सदस्यांनी पाणीकपात तातडीने रद्द करण्याची मागणी करत पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. मात्र, शासनाच्या आदेशाशिवाय पाणीकपात रद्द करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य राहुल दिवे, बाळा निगळ यांच्यासह अनेक सदस्यांनी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केले. गंगापूर आणि मुकणे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना दर शनिवारी पाणीपुरवठा बंद करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित करत ही कपात तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

 

नाशिक शहराला गंगापूर, मुकणे आणि दारणा या तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे ८० टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणावर अवलंबून आहे. यंदा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार दर शनिवारी पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, सध्या गंगापूर धरणात सुमारे ७१ टक्के, तर मुकणे धरणात ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीकपात सुरू ठेवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सदस्यांनी बैठकीत नमूद केले.

पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी शासनाच्या निर्देशानुसारच शनिवारची पाणीकपात सुरू असल्याचे स्पष्ट केले. शासनाकडून नवीन आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्यात बदल करता येईल, असे त्यांनी सांगितले.

यावर स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी सोमवारी सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत गंगापूर व मुकणे धरणांची संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश दिले. पाहणीनंतर पाणीकपात रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीत शहरातील टँकर व्यवस्थेवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मागणी करूनही अनेक भागांत टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. पंचवटी विभागात केवळ एकच टँकर सुरू असून इतर टँकरची बिले केवळ कागदावर काढली जात असल्याचा आरोप सभापती मच्छिंद्र सानप यांनी केला. याप्रकरणी सर्व टँकरची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश देत, नागरिकांना टँकर उपलब्ध न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, धरणांमधील वाढता पाणीसाठा लक्षात घेता शनिवारची पाणीकपात रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी होणाऱ्या संयुक्त पाहणीनंतर प्रशासनाकडून याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असून नाशिककरांचे लक्ष आता त्या निर्णयाकडे लागले आहे.