नाशिक : शरद ऋतूतील टिपूर चांदण्याच्या साक्षीनं रविवारी (दि. २५) द्वारका भागातील श्री श्री राधा मदनगोपाल (इस्कॉन) मंदिरात भक्तिमय वातावरणाचा अनुपम सोहळा पार पडला. श्रीकृष्णाच्या 'वृंदावन'धामाची हुबेहूब प्रचिती देणाऱ्या कलात्मक सजावटीने मंदिराचा मुख्य गाभारा पुरता उजळून निघाला होता. निसर्गरम्य वेलबुट्टी, फुलांची सुंदर आरास, सरोवर, पक्षी अन् पारंपरिक वाद्यांचा सुंदर मेळ साधत उभारलेला देखावा उपस्थितांचे डोळे दीपवून टाकत होता.
या मंगलप्रसंगी श्री राधा-माधवांच्या मूर्तींना परिधान करण्यात आलेली पांढरीशुभ्र राजेशाही वस्त्रे आणि मौल्यवान खड्यांचे दागिने अत्यंत मनमोहक दिसत होते. रासलीलेची अनुभूती देणाऱ्या या दिव्यातिदिव्य रूपासमोर भाविक लीन झाले.
सोहळ्याचा प्रारंभ भल्या पहाटे ५ वाजता मंगल आरतीने झाला. यानंतर 'हरे कृष्ण' नामस्मरण, दर्शन आरती आणि श्रीमद्भागवतावरील रसाळ प्रवचनाचा आनंद भाविकांनी घेतला. सायंकाळी अभंग-कीर्तनानंतर इस्कॉनचे प्रवक्ते श्रीमान शिक्षाष्टकम् प्रभुजी यांनी रासलीले मागील गूढ आध्यात्मिक विचार उपस्थितांसमोर मांडले.
कार्तिक महिन्यानिमित्त आयोजित श्री दामोदर अष्टकम् च्या सुमधुर सुरांनी दीपदानोत्सवास सुरुवात झाली. शेकडो भाविकांनी एकाग्रतेने श्रीकृष्णाला दीप अर्पण केले. उत्सवाची सांगता शरद पौर्णिमेच्या दुग्ध-खिरीचा चविष्ट महाप्रसाद वाटपाने झाली.


