नाशिक : कोजागरी पौर्णिमेच्या मंगल सायंकाळी नाशिकचा पवित्र गोदाघाट एका अलौकिक आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वसंध्येला देवमामलेदार पटांगणात ५१७ शंखवादकांनी एकाच वेळी केलेल्या भव्य शंखनादाने संपूर्ण पंचवटी परिसर दुमदुमून गेला. या अभूतपूर्व उपक्रमाने अमेरिकेचा ३०३ शंखनादाचा जुना विक्रम मोडीत काढत 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि 'अनंतविजय शंखनाद पथक' यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी जगन्नाथपुरी व चेन्नई येथून विशेष शंख मागवण्यात आले होते. सायंकाळपासूनच साधकांची नोंदणी, कडक पडताळणी आणि शिस्तबद्ध नियोजनाची लगबग सुरू होती. शंखनादापूर्वी प्राणायाम करून साधकांनी तयारी केली, तर 'जय भवानी, जय शिवाजी' आणि बाप्पाच्या जयघोषाने वातावरण अधिकच चैतन्यमय झाले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी सर्व निकषांची तपासणी करून जसा विश्वविक्रमाचा अधिकृत निर्णय जाहीर केला, तसा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष केला.
या ऐतिहासिक सोहळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि साधू-महंत उपस्थित होते. ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणापूर्वी झालेला हा महाशंखनाद कुंभपर्वाच्या भव्य नांदीचा द्योतक ठरला असून सोहळ्याची सांगता महागोदा आरतीने झाली.


