नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरु असलेली खोदकामे, रस्त्यांची कामे, बांधकामांतून उडणारी धूळ आणि प्रमुख चौकांतील वाहतूक कोंडी यामुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. गुरुवारी (दि. १५) नाशिकचा एक्यूआय १५२ वर पोहोचला. म्हणजेच हवा आता आरोग्यासाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. शहरातील हवा तपासणी केंद्रांवर पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती आहे. हे कण श्वसनमार्गातून थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. परिणामी, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होण्याच्या तक्रारी वाढत आहेत..
शुद्ध हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५२ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी (दि. १५) नाशिकची हवा दिल्लीपेक्षाही खराब नोंदवली गेली. शहरातील सिंहस्थ कामांसाठी सुरू असलेली खोदकामे, वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. पीएम २.५ धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने सर्दी, खोकला आणि अॅलर्जीच्या रुग्णांत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे..
शहरातील काही परिसरांत वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. सिंहस्थाच्या कामांसह विविध विकासकामांसाठी रस्त्यांवर खोदकाम सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. कोंडीत अडकलेल्या वाहनांचा धूर आणि बांधकामस्थळांवरील धूलिकण हवेत मिसळत आहेत. बांधकामस्थळी आच्छादन करणे, धूळ उडू नये म्हणून पाण्याची फवारणी करणे आणि रस्ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्रदूषणात भर पडत असल्याचं सांगितलं जातंय..
एक्यूआय या निर्देशांकावरून हवेतील प्रदूषणाची पातळी आणि त्याचा आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम समजतो. एक्यूआय ० ते ५० असल्यास हवा चांगली मानली जाते. ५१ ते १०० समाधानकारक, तर १०१ ते १५० संवेदनशील गटांसाठी अपायकारक असतो. १५१ ते २०० या श्रेणीत हया अपायकारक ठरू शकते, नाशिकचा एक्यूआय १५२ झाल्याने नागरिकांनी धुळीचा संपर्क कमी करावा असे आवाहन करण्यात आले आहे..


