नाशिक : नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंग गडावर दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहिमेची तयारी केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गडावरील तसेच परिसरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येणार असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. या काळात हॉटेल्स, भोजनालये, मिठाई दुकाने, पेढा व प्रसाद विक्री केंद्रे तसेच तात्पुरत्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये मोठी उलाढाल होते. त्यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या निकषांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. अन्नविषबाधेच्या घटना टाळणे आणि भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
तपासणीदरम्यान अन्नपदार्थांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, तयार पदार्थांची साठवणूक, योग्य तापमान आणि धूळ, माश्या व कीटकांपासून अन्नपदार्थांचे संरक्षण यांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, पेढा आणि लवकर खराब होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या साठवणुकीचीही तपासणी होईल.
याशिवाय अन्नपदार्थ तयार करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी आणि पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य असणे बंधनकारक आहे. आवश्यकतेनुसार पाणी तपासणी अहवाल उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नसून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.


