नाशिकमध्ये साथीच्या आजारांचा फैलाव; ऑगस्टमध्ये २ हजार ४५ रुग्णांवर उपचार
नाशिक शहरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढताना दिसत असून, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू आणि टायफॉईडसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. वडाळा गावातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये ऑगस्ट महिन्यात तब्बल २ हजार ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
वडाळा गावातील आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. वृंदावन कॉलनीतील आरोग्य केंद्रात ९२३ रुग्णांवर, तर ‘आपला दवाखाना’ येथे १ हजार १६५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचं चित्र आहे.
यामध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचं वैद्यकीय अधिकारी आशिष पाडोळे यांनी सांगितलं आहे. पावसाळ्यात साचणारं पाणी, अस्वच्छता आणि डासांची वाढती उत्पत्ती यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये आणि डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. ताप, अंगदुखी किंवा इतर त्रास जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


