कळवण तालुक्यातील पाच शासकीय आश्रम शाळांमधील एकूण ३४ विद्यार्थी सध्या कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विसापूर येथील २५, एका आश्रम शाळेतील पाच, सालनेर येथील एक, मानूर येथील दोन आणि अन्य एका शाळेतील एका विद्यार्थ्याचा समावेश असल्याची माहिती आहे.

विद्यार्थ्यांना तापाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सध्या तापाचे प्रमाण कमी झाले असून, पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकहून वैद्यकीय पथकही कळवणमध्ये दाखल झाले आहे.

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. आश्रम शाळांमध्ये औषधे आणि वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

रुग्णवाहिकांची व्यवस्था, रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आश्रम शाळांमधील व्यवस्थेच्या प्रश्नाची मुख्यमंत्री स्तरावरूनही गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांचे निलंबन करण्यात आले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.