नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात घरांवरून आणि घरांच्या अगदी जवळून जाणाऱ्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेक अपघात घडूनही तारा भूमिगत करण्याचा निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सिडको परिसरातील अनेक भागांमध्ये उच्चदाब तसेच इतर विद्युत तारा घरांच्या छतांवरून आणि निवासी भागातून जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या तारांमुळे यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या असून काही निष्पाप मुलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
पावसाळ्यात या तारांचा धोका आणखी वाढत असल्याने नागरिक, लहान मुले तसेच घरांवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. वादळी वारे, पावसाचे पाणी आणि झाडांच्या फांद्या तारांवर पडण्याच्या घटनांमुळे संभाव्य दुर्घटनेची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांनी सिडको परिसरातील सर्व विद्युत तारा भूमिगत करण्याची मागणी केली असून, महावितरण आणि संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.


