नाशिक :  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस होता. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात आज मोठ्या संख्येने महिला शेतकरी सहभागी झाल्या. आंदोलकांनी हातावर काळ्या फिती बांधून राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

रिंग रोड प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. शासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

 

आंदोलनस्थळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या जमिनी आणि उपजीविकेचा प्रश्न गंभीर असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.

आंदोलकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सध्या या आंदोलनाकडे जिल्ह्यातील शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे लक्ष लागले असून शासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.