दुष्काळाची घोषणा स्वागतार्ह, मात्र शेतकऱ्यांना ठोस मदत द्या; किसान सभेची सरकारकडे मागणी

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचे किसान सभेने स्वागत केले आहे. मात्र केवळ दुष्काळ जाहीर करून भागणार नसून संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी किसान सभेने केली आहे.

सलग दोन खरीप हंगामांमुळे शेतकरी संकटात सापडले असल्याचे किसान सभेने म्हटले आहे. पात्र थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जसवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पीकविम्याची संरक्षित रक्कम भरपाईचा आधार ठरवावा, अशी मागणीही किसान सभेने केली आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.