देवळा तालुक्यातील लोहणेर गावात भटक्या कुत्रे आणि मांजरींच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी चिकन खाऊ घातल्याने २१ कुत्रे आणि २ मांजरींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी देवळा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन व्यक्तींनी बाजारातून चिकन खरेदी करून त्यात विषारी पदार्थ मिसळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर हे चिकन गावातील मोकाट कुत्रे आणि मांजरींना खाऊ घालण्यात आल्याची माहिती आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील विविध ठिकाणी प्राण्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याने मृतदेह गोळा करून अमृतधामच्या मागील परिसरात पुरल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता बालाजी मंदिराजवळ एक कुत्रा विषबाधेमुळे तडफडताना आढळला. पोलिसांच्या उपस्थितीतच या कुत्र्याचा मृत्यू झाला.
मृत कुत्र्याचा मृतदेह पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवण्यात आला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, विषारी द्रव्याचे नमुने पुढील तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी रमेश आहिरे आणि मुकेश परदेशी या दोघांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमागचा नेमका हेतू काय होता, याचा तपास देवळा पोलीस करत आहेत.
दरम्यान, गावात मोठ्या संख्येने प्राण्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विषारी पदार्थ नेमका कोणता होता आणि प्राण्यांना तो कशासाठी देण्यात आला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.


