त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर गुरुवारी (दि. १५) सकाळी मंत्रोच्चाराच्या घोषात आणि धार्मिक वातावरणात ध्वजस्तंभ पूजन पार पडले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सोहळा विधिवत पार पडला. सायंकाळी संपन्न झालेल्या महागंगा आरतीने या सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, "सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांचे गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन आणि सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे." तसेच राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सुरक्षा व सोयी-सुविधांची तयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
३१ फुटी ध्वजस्तंभाचे वैशिष्ट्य:
पूजन करण्यात आलेला ध्वजस्तंभ ३१ फूट उंच असून, त्यावर समुद्रमंथनाची भव्य संकल्पना साकारण्यात आली आहे. मंथनातून प्राप्त झालेली रत्ने, खालील भागात श्री गणेशाची प्रतिमा आणि सर्वात वर अमृतकलश धारण केलेल्या गरुडाची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली आहे.
या सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पुरोहित संघाचे पदाधिकारी, विविध आखाड्यांचे प्रमुख, साधू-संत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


